प्रकाश बाळ जोशी यांचे
अनिल किणीकर
१
प्रकाश बाळ जोशी हे महाराष्ट्रातील शब्द कलावंत –
केवळ पत्रकाराच नव्हे तर कवी, कथाकार आणि आघाडीचे चित्रकार असा त्यांचा मोठा
प्रवास आहे. गेली अनेक वर्षे त्यांच्या पेंटिंग्जची प्रदर्शन मुंबई बंगलोर, पुणे,
मिनीआपोलिस, लास वेगास (अमेरिका), बाझेल
(स्वित्झर्लंड) क्रोएशिया , नॉर्वे ,
इस्मीर ( तुर्कस्तान ), लिस्बन (पोर्तुगाल) , थीम्पू (भूतान) अशा अनेक ठिकाणी भरलेली
आहेत. त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन शिकॅगो येथे जानेवारी २०१४ मध्ये भरत आहे त्यानिमित्ताने त्यांच्या चित्रकलेचा
आणि एकंदरच व्यक्तिमत्वाचा घेतलेला हा लहानसा आढावा.
२
प्रकाश बाळ जोशी . शब्दां वर प्रभुत्व . टाइम्स
ऑफ इंडिया मध्ये २५ वर्षे पत्रकार. मराठी इंग्रजी कथा लेखन. चित्रकला आणि
पेंटिंग्ज द्वारे स्वतः चे विचार , विश्लेषण आणि व्यक्तिमत्व प्रगट करीत आहेत.
गेली पन्नास वर्षे सतत रेषा आणि रंगाचा रियाझ केल्यावर गेली १२ वर्षे स्वताःचे काम
लोकांपुढे मांडत आहेत. लहानपणापासूनच पारंपारिक चित्र काढण्याऐवजी जसे जाणवेल तसे
रेखाटन करण्याकडे कल .
त्यांच्या पेंटिंग मध्ये निसर्गातील दृश्य ,
पानं , फुले, झाड , डोंगर-नद्या, चंद्र-सूर्य किंवा पक्षी प्राणी ही प्रतीकात्मक
पद्धतीने काढली आढळतात . जे निसर्गाबाबत तेच माणसांच्या आकृती बाबत . त्यांची काहीशी आधुनिक (modern) - अमुर्त-शैलीशी(abstract) मिळती जुळती शैली आहे. म्हणजे विषय मांडण्या
पेक्षा आशय मांडण्याकडे जास्त कल आहे.
शब्द आणि रेषा दोन्हीचे आकर्षण असल्यामुळे पत्रकारिता करीत
करीत त्याच वेळी आजूबाजूच्या वातावरणाचे चित्रीकरण , स्केचेस ही करीत राहील्या
मुळे शब्द आणि रेषा दोन्हीचा रियाझ एकाच वेळी चालू राहिला. ते स्वतः मितभाषी आहेत.
स्वताहून स्वतःविषयी काही नबोलणे हा
त्यांचा स्वभाव आहे.
त्यामुळे त्यांच्या चित्रकलेविषयी फारच कमी जणांना त्याची
माहिती होती. मुंबईतील आर्टिस्ट सेंटर येथे
भरलेल्या पहिल्या प्रदर्शनाला फारच छान प्रतिसाद मिळाला. त्यात सहकाऱ्यांना,
परिचितांना, कलाप्रेमींना आश्चर्य आणि
उत्सुकता होती. वन लाईन स्केच म्हणजे अखंड रेषेतून त्यांनी जगण्यातले अनेक विषय
अर्थ पूर्ण शैलीत व्यक्त केले होते. . एकूण विश्वाचा प्रवाह अखंड चालू असतो. पण
अशा काही अनाकलनीय अनपेक्षीत अविश्वसनीय घटना घटतात की त्यात्यून अनेक प्रश्न
निर्माण होतात सृष्टीची आणि प्राणी सृष्टीची घडी विस्कटून जाते. माणूस सैरभैर होतो
कोणाही कलावंत अशा घडमोडीपासून अलिप्त राहू शकत नाही. परिणामी प्रकाश बाळ जोशी
यांच्या सारखे कलावंत अस्वस्थ होतात , त्यांना शब्द अपुरे वाटू लागतात आणि म्हणूंच
ते रेषा आणि रंगांकडे वळतात. "गेटवे " या प्रदर्शनाला याच मुळे जाणकार
,विचारवंत आणि कलाकारांचाही चांगला प्रतिसाद मिळाला.
३
प्रकाश बाळ जोशी यांच्या ओईल पेटिंग चे विषयही
सुरवातीपासूनच अपारंपारिक. त्यांनी लान्द्स्केप ( landscape painting ) पेंटिंग
केली ती काही एका विचाराने. लान्द्स्केप म्हटली की नेहमी डोळ्यासमोर उभी
राहतात निसर्ग चित्रे. विलोभनीय मन हरखून टाकणारी
निसर्गाची , निसर्गातील सौंदर्याची डोंगर-नदी समुद्र-आकाश सूर्योदय-सूर्यास्त
ग्रामीण वास्तव झाडे-प्राणी मानव यांचे चित्रण. पण प्रकाश यांची चित्रे एक विचार
सांगणारी, विचार करायला लावणारी आणि अंतर्मुख व्हायला लावणारी आहेत. ओईल पेंट मधील ही पेंटिंग्ज ही २१ व्या शतकातील
माणसाचा प्रवास , पृथ्वी-निसर्ग-मानव यांच्यातील परस्पर संबंध व जीवनाशी निगडीत
दैन्दंदिन जगण्याशी संबंधित आहेत. पर्यावरण , पर्यावरणाचा नाश , हे विषय घेऊन
एकंदरच अस्थित्वाचा प्रश्न मांडण्याचा प्रभावशाली प्रयत्न आहे.
पर्यावरणाचा ऱ्हास त्याचे वास्तव चित्रण, विदारक सत्य
स्वीकारणारी त्यांची अस्थित्वाची भाषा , त्यांचे समग्र दर्शन शोधण्याचा ध्यास या
पेंटिंग मागे दिसून येतो. आजचे अनेक प्रश्न अक्राळ विक्राळ स्वरूप घेऊन उभे असले ,
जागतिकीकरणाची प्रक्रिया त्यात भर घालीत असली तरी मुलभूत प्रश्नांना आपल्या दृश्य
कलेत वेगळ्या पद्धतीने मांडणी करण्याचा प्रयत्न प्रकाश बाळ जोशी करतात. कलावंताला
असणारे अध्यात्मिक आणि सामाजिक भान या पेंटिंग मधून प्रत्ययाला येते.
नदी आणि हरवणाऱ्या नद्या हा प्रकाश बाळ जोशी यांचा सतत
चिंतनाचा विषय. लहानपणी ते स्वतः मुंबई जवळील सूर्या नदीत बुडण्याचा प्रसंग आला होता त्याचे खोल वर
परिणाम त्याच्या भावविश्वावर झालेले दिसून येतात आणि त्याचे चित्रण त्यांच्या
पेंटिंग मध्ये मधून मधून दिसून येते. पाण्याचा प्रचंड उपसा , औद्योगीकीकरण ,
प्रदूषण या मुळे अनेक नद्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. या नद्या गायब होण्याचा
मानवनिर्मित प्रश्न ओईल पेंटिंग मधून व्यक्त होतो. पर्यावरणाचा ऱ्हास आणि त्यामुळे
झाडे-पक्षी , चंद्र-सूर्य हे घटकही प्रकाश बाळ जोशी यांच्या पेंटिंग मधून गायब
झालेले दिसतात आणि त्यांची जागा अव्यक्त गुढ अशा अवकाशाने व्यापलेली दिसते.
Mindscape 4 acrylic on canvas
४
कोणत्याही कलावंताला आहे ते माध्यम अपुरे वाटते आणि तो वेग
वेगळ्या मार्गाने वेग वेगळी माध्यमे वापरून अभिव्यक्ती करीत असतो. या अपुरे पणांची
एक अस्वस्थता असते आणि तीच कलाकाराला प्रयोग करायला भाग पडते. अशाच एका टप्प्यावर
, शब्दां बरोबरच रंग आणि रेषा प्रकाश बाळ जोशी यांना खुणावू लागल्या आणि त्यांनी
चित्रकला पेंटिंग याचे कोणतेही औपचारिक शिक्षण घेतलेले नसतांना आरा आणि यशवंत
चौधरी या सारख्या नावाजलेल्या कलाकारांच्या संगतीत मोठ्या कॅनवास चे आव्हान स्वीकारले आणि आपल्या अभिव्यक्तीला एक नवी वाट
करून दिली . मोठ्या आकाराचा कॅनवास आणि ओईल पेंट ही दोन्ही अवघड आव्हाने स्वीकारत
त्यांनी एक नवीन अविष्कार स्वातंत्र्य मिळविले आणि अभिव्यक्तीची कक्षा विस्तारली.
५
बदलत्या काळाच्या ओघात निसर्गातही परिवर्तन होत असते.
डोंगरांच्या रचना , नद्यांचे प्रवाह जमिनीचे प्रकार, जंगलाचे स्वरूप , पशु
पक्षांचे ,मानवाचे होणारे नित्य स्थलांतर नवीन जीवन घडवीत असतात. हे बदल संवेदनशील
कलाकार टिपत असतो. नोंद करीत असतो. सरस्वती नदीचे अंतर्धान पावणे हा एक विषय घेऊन
प्रकाश बाळ जोशी काम करीत आहेत. लुप्त झालेली नदी, तिचे त्या संदर्भातील पौराणिक,
ऐतिहासिक, सामाजिक, धार्मिक अशी विविध अंगे लक्षात घेऊन त्यावर प्रकाश बाळ जोशी
यांचे काम चालू आहे.
६
कोणत्याही कलाकृतीचे अंतर्मुख होणे हे त्या कलेच्या अभिजाततेचे अपरिहार्य लक्षण असते. प्रकाश बाळ जोशी यांची कलाकृती ही
संवेदनशील प्रेक्षकाला कला रसिकाला अंतर्मुख करायला लावते आणि जे समोर दिसते
त्याच्या पलीकडील शाश्वत सत्याचा विचार करायला लावते – अस्वथ करते. त्यांच्या
पेंटिंग ची शीर्षके देखील विचारप्रवर्तक असतात – कला रसिकाला समोरच्या अमूर्त
चित्राकडे कसे बघावे याचे किंचित मार्गदर्शन करणारे असतात. जसे – व्हानीशिंग रिवर
(vanishing
river) , टोटल लोस (total loss) , मेल्टिंग लाव्हा (melting lava) ,
सिम्फोनी ऑफ चेंज (symphony of change) .
अशा पेंटिंग मधून एखादीही माणसाची एखादीही भासमय आकृती ( figure ) नाही ,
तरीही माणसाच्या मनातील आंदोलने संघर्ष आणि अस्थित्व भान ते ताकदीने उभे करतात.
त्यांच्या प्रत्येक पेंटिंग मधून हे जाणवत असत. स्त्री पुरूष ही प्रतीकृपण म्हणून
सुद्धा आली की संकल्पनांची पन्नास टक्के गृहीतिका आपोआपच येतात आणि निखळ मनांन
पेंटिंग बघण काहीस मर्यादित होत. निसर्ग
प्रमाणेच आपल्या पेंटिंग मध्येही निखळता असावी असा त्यांचा कायम कटाक्ष दिसतो.
स्त्री आणि पुरूष हे निसर्गाचीच प्रतीके आहेत .
प्रतीका ऐवजी मूळ स्र्त्रोता कडे म्हणजे विश्वारुपाकडे रंग आणि ब्रश वळलेले
दिसतात. प्रकाश बाळ जोशी यांच्या पेंटिंग
चे मोठे सामर्थ्य म्हणजे या पेंटिंग मधून पंचमहाभूतांचे अव्यक्त असं वेगळा स्वरूप
अनुभवायला मिळत. ब्राम्हनंदाची अवस्था सुख-दुख आनंद –वेदना आहे-नाही या दैद्वातुंनच अदैत्वाकडे नेणारा हा
प्रयत्न आहे.
७
खरतर एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाणे हा खडतर आणि
अवघड प्रवास आहे. वृत्तपत्रातील असंख्य शब्दांच्या जंजाळातून आपली संवेदनशीलता
टिकवून ठेवणे अवघड काम त्यातून पुढे रंग आणि रेषा यांच्या सहायाने काम करणे अधिक
गुंतागुंतीचे काम. अशी माध्यमे बदलणारे आणि आव्हान पेलणारे जे कमी कलाकार आहेत
त्यातील प्रकाश बाळ जोशी हे एक आहेत.
८
गेली चार दशक प्रकाश बाळ जोशी मुंबई महानगरीत राहत आहेत आणि
त्यातील गल्ली बोळापासून ते पसरत्या
उपनगरां पर्यंत मुंबई शहर त्यांनी फिरून पाहिलेल आहे . महानगरीतील मयसभेचे
लोभसवाणे बदलते स्वरूप आणि लहानमोठ्या सर्वावर गारुड घालणारे बॉलिवूड. महानगरात
येणाऱ्या प्रत्येकाचे एक स्वप्न आणि भयाण वास्तव , होणारी घुसमट, दाहक , प्रखर आणि
काहीस आश्वासन देणार शहर त्यांच्या रेखाटनातून दिसते.
प्रकाश बाळ जोशी यांची पेंटिंग पाहतांना मला जगप्रसिद्ध
कलंदर कलाकार स्ल्वोदोर डाली यांचे एक वाक्य आठवते ----
रंग आणि शब्द हे नेहमीच अव्यक्तातून व्यक्त होत असतात.
====
अनिल किणीकर हे लिटील मागेझीन चळवळीतील आघाडीचे संपादक आणि लेखक
No comments:
Post a Comment